Ticker

6/recent/ticker-posts

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत द्या--प्रदीप वाघ यांची उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांकडे मागणी

 


दैनिक लोक युवा पालघर प्रतिनिधी फैजान खान

जव्हार: पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि तलासरी या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्कमाफीसह अन्य सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे संघटक तथा मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती व आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य सरकारने पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि तलासरी या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश केला आहे. या भागातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण आणि आदिवासी कुटुंबांतील असून, अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    डॉक्टर, वकील, अभियंता यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना कर्जाचा आधार घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांवरील आर्थिक भार वाढला आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

    ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना करणे आवश्यक आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कमाफी द्यावी, तसेच इतर आवश्यक सवलती आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती वाघ यांनी निवेदनातून केली आहे. या मागणीचे निवेदन २३ ऑक्टोबर रोजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना ईमेल द्वारे सादर करण्यात आले असून, त्याची प्रत पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments