Ticker

6/recent/ticker-posts

एकीकडे जनता पाण्यासाठी वणवण, तर दुसरीकडे रस्त्यावर हजारो लिटर पाण्याचा महापूर



दैनिक लोकयुवा दिग्रस तालुका प्रतिनिधी/गजानन गंडाळे 

  दिग्रस नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणा आणि मुजोर कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शनि मंदिर रोडकडून कमान गेटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनला लागलेल्या गळतीमुळे गेल्या काही दिवसांपासून हजारो लिटर शुद्ध पाणी गटारात आणि रस्त्यावर वाया जात आहे. शहरात अनेक प्रभागांत नागरिक पाण्यासाठी पालिकेच्या दारात खेटे घालत असताना, मुख्य रस्त्यावर मात्र पालिकेच्या नाकर्तेपणामुळे पाण्याचा अक्षरशः महापूर वाहत आहे.

   पाईपलाईन फुटल्याने संपूर्ण शनि मंदिर ते कमान गेट परिसरात पाणीच पाणी झाले असून रस्त्यावर घाणेरड्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. निसरड्या झालेल्या रस्त्यावरून चालताना दुचाकीस्वारांचे जीव टांगणीला लागले आहेत. रात्रीच्या अंधारात दुचाकी घसरून अनेक जण जखमी होत असून, पालिकेच्या या दुर्लक्षामुळे एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतापजनक सवाल नागरिक विचारत आहेत.

   एका बाजूला 'पाणी वाचवा, जीवन वाचवा'च्या पोकळ घोषणांच्या पाट्या लावायच्या आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावर होणाऱ्या बेसुमार नासाडीकडे डोळेझाक करायची, असा पालिकेचा ढोंगी कारभार सुरू आहे. ही गळती तात्काळ दुरुस्त करून रस्त्यावरील चिखल हटवला नाही, तर नगरपरिषदेच्या दारात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिक व वाहनधारकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments