‘पंढरीची वारी 2.0’ कवितेतून आदिवासींचे विस्थापन, संघर्ष आणि अस्तित्वाचा प्रश्न मांडला
दैनिक लोकयुवा धडगाव प्रतिनिधी: अर्जुन पावरा
नंदुरबार येथे जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात आदिवासी कवी, साहित्यिक, दिग्दर्शक व गीतकार सुभाष वळवी यांना निमंत्रित कवी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या ‘पंढरीची वारी 2.0’ या कवितेतून सातपुड्यातील आदिवासी समाजाचे विस्थापन, संघर्ष आणि अस्तित्वाचा प्रश्न प्रभावीपणे मांडला. त्यांच्या काव्यसादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना भावूक केले, तर कवितेच्या शेवटच्या भागाने समाजात शिक्षण, संघटन आणि संघर्षाची ऊर्जा निर्माण करणारा संदेश दिला.
‘पंढरीची वारी 2.0’ हे कवितेचे नाव ऐकून सुरुवातीला श्रोत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. मात्र, कविता सुरू होताच सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या वेदना, विस्थापनाचा प्रश्न, संघर्षमय जीवन आणि अस्तित्वासाठी सुरू असलेली धडपड यांचे वास्तव प्रभावी शब्दांत उलगडले. या सादरीकरणादरम्यान अनेक उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यानंतर कवितेचा सूर बदलताच संघर्षाची जाणीव आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारा संदेश श्रोत्यांपर्यंत पोहोचला.
आदिवासी कवींच्या कवितांमधून अनेकदा दुःख, संघर्ष आणि कष्टांचे चित्रण केले जाते. मात्र, या वेदनांना शिक्षणाची जोड देणेही तितकेच आवश्यक आहे. शिक्षणाशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास शक्य नाही, ही भूमिका मांडत वळवी यांनी आदिवासी समाजातील कवी आणि विचारवंतांनी आपल्या लेखणीला वास्तवाची धार देण्याची गरज अधोरेखित केली.
समाजातील प्रश्न, शासनाची धोरणे आणि आदिवासी बांधवांच्या हक्कांशी संबंधित विषयांवर लेखणीच्या माध्यमातून निर्भीडपणे भाष्य करण्याची गरज असल्याचेही त्यांनी व्यक्त केले. केवळ दुःख मांडण्यापुरते साहित्य मर्यादित न राहता, समाजाला दिशा देणारे, जागृती घडवणारे आणि परिवर्तनासाठी बळ देणारे असावे, असा विचार त्यांच्या काव्यसादरीकरणातून व्यक्त झाला. कवितेच्या शेवटी त्यांनी समाजाला एक महत्त्वपूर्ण संदेश दिला
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!”
या संदेशातून शिक्षण, सामाजिक एकजूट आणि हक्कांसाठीच्या संघर्षाचे महत्त्व अधोरेखित झाले. सुभाष वळवी यांच्या ‘पंढरीची वारी 2.0’ या कवितेने आदिवासी समाजाच्या वास्तवाला साहित्याच्या माध्यमातून प्रभावी अभिव्यक्ती दिली.— सुभाष वळवीआदिवासी कवी, साहित्यिक, दिग्दर्शक व गीतकार

0 Comments