दैनिक लोकयुवा जव्हार,; प्रतिनिधी फैजान खान
जव्हार: जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातून एफडीआर (मुदत ठेव पावती) कागदपत्रे चोरीला गेल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला वेग आला आहे. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर दोन व्यक्तींची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणातील संबंधित व्यक्तींची नेमकी भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारांच्या मुदत ठेव पावत्यांबाबत तसेच महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याच्या प्रकरणी शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या फुटेजमध्ये दोन व्यक्ती कागदपत्रांच्या फायली हाताळताना दिसून आल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप देसामुख यांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यातून दोन व्यक्तींची ओळख पटविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तींचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, कागदपत्रे गहाळ होण्यामागील कारण काय आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. तपास पूर्ण होऊन अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

0 Comments