दैनिक लोकयुवा प्रतिनिधी बोरगाव जय गांगुर्डे
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष सोनवणे यांचा नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रशासकीय स्तरावर त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गौरव करण्यात आल्याने आरोग्य विभागात आनंदाचे वातावरण आहे.
डॉ. आशिष सोनवणे यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया तसेच विविध आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबवून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शासनाच्या आरोग्य योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, कुटुंब कल्याण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि आरोग्य सेवांचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
सांघिक प्रयत्नांचा गौरव या यशाचे श्रेय केवळ एका व्यक्तीला नसून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमधील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि सहकाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांना जाते, असे यावेळी नमूद करण्यात आले. ग्रामीण भागातील दुर्गम व तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेले परिश्रम, प्रभावी नियोजन आणि समन्वय यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.
डॉ. आशिष सोनवणे यांच्या सत्कारामुळे बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्याचा गौरव झाला असून, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.

0 Comments