Ticker

6/recent/ticker-posts

जव्हार, मोखाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धरणे आंदोलन


पालघर जिल्हा प्रतिनिधी फैजान खान :

जव्हार आणि मोखाडा तालुक्यांत कमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, दोन्ही तालुक्यांत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी आंदोलन करत केली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक उपजिल्हाधिकारी यांना पी. के . सिद्धार्थ रामकुमार यांना निवेदन देण्यात आले . 

   जव्हार आणि मोखाडा तालुक्यांतील आदिवासी शेतकऱ्यांचे भात, नागली, वरई आणि उडीद ही प्रमुख पिके पावसाअभावी बाधित झाली आहेत. शेती हा येथील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असल्याने पिकांचे नुकसान झाल्यामुळे कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील उत्पन्न घटल्याने कर्जफेड आणि आगामी हंगामाची तयारी करणेही कठीण झाले आहे.

   प्रशासनाने दोन्ही तालुक्यांतील गावांमध्ये पावसाची स्थिती आणि पिकांच्या नुकसानीची तातडीने पाहणी करावी. नुकसानग्रस्त शेतजमिनींचे प्रत्यक्ष पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करावा, तसेच परिस्थितीचा विचार करून दुष्काळसदृश स्थिती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार आर्थिक मदत व पीकनुकसानभरपाई द्यावी, पीकविमा आणि कृषी कर्जासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, तसेच गंभीर परिस्थिती असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक निलेश घोलप, जव्हार तालुकाध्यक्ष गोपाळ वझरे, मोखाडा तालुकाध्यक्ष निलेश फुफाणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments