दैनिक लोक युवा प्रतिनिधी पवन शिरभाते आर्वी
१५ ऑक्टोबर २०२६ हा दिवस जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिवस आहे.
"ऊन, वारा, पाऊस किंवा कडाक्याची थंडी अशा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता, भल्या पहाटे नागरिकांच्या घराघरांमध्ये ताज्या घडामोडी पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यासाठी आज १५ ऑक्टोबर रोजी 'जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन' साजरा केला जात आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. डॉ. कलाम यांनी स्वतः बालपणी वृत्तपत्रे विकून आपल्या संघर्षाची सुरुवात केली होती, याच प्रेरणेतून या दिवसाची सुरुवात झाली.
मात्र, या दिनाचे औचित्य साधत आज वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दुरवस्थेकडे आणि त्यांना भेडसावणाऱ्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले जात आहे. आजच्या आधुनिक डिजिटल युगातही हा कष्टाळू घटक समाजाला माहिती पुरवण्याचे अविरत काम करत आहे, पण दुर्दैवाने आज वृत्तपत्र विक्रेत्यांना योग्य तो न्याय मिळत नसल्याचे चित्र समोर येत आहे.
मुख्य मागण्या आणि शासकीय सवलतींची गरज:
• कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळ: वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी शासनाने विशेष आर्थिक तरतूद करावी.
• शासकीय सवलतींची अंमलबजावणी:
वृतपत्र विक्रेत्यांसाठी पेन्शन योजना, मोफत वैद्यकीय विमा (हेल्थ इन्शुरन्स) आणि पाल्यांच्या शिक्षणासाठी विशेष सवलती शासनाने जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे.
•रस्त्यांवर किंवा नाक्यांवर वृत्तपत्र विक्री करणाऱ्यांना महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाकडून होणारा त्रास थांबवून अधिकृत जागा किंवा ओळखपत्रे दिली पाहिजेत.
"आम्ही रोज सकाळी लोकांना ज्ञान वाटतो, पण आमच्या हक्काच्या न्यायासाठी मात्र आम्हाला शासनाकडे वारंवार दाद मागावी लागत आहे. सरकारने आता केवळ आश्वासने न देता ठोस सवलती दिल्या पाहिजेत," अशी भावना अनेक वृत्तपत्र विक्रेत्यांनी व्यक्त केली.
आज डॉ. कलाम यांच्या स्मृतीला अभिवादन करून शासनाने या शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलणे हीच या दिवसाची खरी ओळख ठरेल., असे मत महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक संघाने सुद्धा केले आहे.

0 Comments