जालना संतराम जाधव | दि. २७ ऑक्टोबर २०२६
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी आमदार हिकमत दादा उढाण यांनी आज मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून तातडीने आवर्तन जाहीर करून पाणी सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
घनसावंगी मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह पशुधनासाठी चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे या वेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यास शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार हिकमत दादा उढाण यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली.
आता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत कोणता निर्णय होतो आणि घनसावंगी मतदारसंघाला पाणी कधी मिळते, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0 Comments