Ticker

6/recent/ticker-posts

बिलगाव येथे जन आरोग्य समितीची बैठक संपन्न; आरोग्यविषयक विविध मुद्द्यांवर चर्चा


दैनिक लोकयुवा धडगाव प्रतिनिधी: अर्जुन पावरा

बिलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी जन आरोग्य समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत मानव विकास मिशन, जननी सुरक्षा योजना, नसबंदी शिबिर तसेच बालकांच्या लसीकरणासह विविध आरोग्यविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.बैठकीला काही सरपंच व कर्मचारी अनुपस्थित असल्याने बैठक रद्द करण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, चालू महिन्यात पुन्हा बैठक घेणे शक्य नसल्याने उपस्थित सदस्यांच्या सहभागातून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

मानव विकास मिशनच्या लाभार्थी महिलांच्या यादीबाबत चर्चा

मानव विकास मिशनअंतर्गत बोडीत मजरे येथील महिलांच्या प्रलंबित लाभाचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. सन २०२४ व २०२५ मधील प्रलंबित लाभार्थी तसेच सन २०२६ मधील नवीन लाभार्थी महिलांची यादी तयार करून चेकसह बँकेत जमा करण्यात आल्याची माहिती एलएचव्ही सिस्टर यांनी दिली. जमा केलेल्या यादीतील किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, याची माहिती बँकेकडून घेऊन यादी उपलब्ध करून देण्याबाबत क्लार्क यांना सांगण्यात आले.

जननी सुरक्षा योजनेच्या प्रलंबित रकमेचा मुद्दा

जननी सुरक्षा योजनेअंतर्गत काही महिलांना मागील वर्षभरापासून लाभाची रक्कम मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याबाबत संबंधित लाभार्थी महिलांची यादी कार्यालयात जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.याशिवाय, सीटीसीमध्ये केवळ एक भाग दाखल होत असल्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. येत्या ३ नोव्हेंबर रोजी नसबंदी शिबिर आयोजित करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

नवजात बालकांच्या बीसीजी लसीकरणाचा प्रश्न

बीसीजी लसीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे जन्मानंतर लगेच लसीकरण न झालेल्या काही बालकांचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. याबाबत डॉक्टर व एलएचव्ही यांच्यासोबत चर्चा करून संबंधित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले.

दरम्यान, पुढील जन आरोग्य समितीची बैठक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.बैठकीला माधव पावरा, जाड्या पावरा, सरपंच खुशाल पावरा, सरपंच रोहिदास पाटील, पंचायत समिती सदस्य रामसिंग पावरा, सरपंच तसेच डॉ. सुरेंद्र पावरा व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments