Ticker

6/recent/ticker-posts

समता सैनिक दलाच्या माध्यमातून गंधकुटी पर्वतावर ( बुद्धभूमी ) येथे १४ ऑक्टोबरला धम्मचक्र परिवर्तन दिन व ‘बुद्ध-भीम गीतांचा भव्य कार्यक्रम’...!

 

काटोल प्रतिनिधी :-विकास सोमकुवर 

काटोल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या ७०व्या वर्धापनदिनानिमित्त समता सैनिक दल (ग्रामीण ०१), नागपूर यांच्या वतीने बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ‘बुद्ध-भीम गीतांचा भव्य कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम गंधकुटी पर्वत ( बुद्धभूमी ), घुबडमेट, ता. काटोल, जि. नागपूर येथे होणार आहे. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुषांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि मानवतेच्या विचारांचा प्रसार गीतांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

समता सैनिक दलाच्या ‘गाव तिथे शाखा, घराघरात सैनिक’ या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, बहुजन समाजात सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर, कारंजा, पारशिवनी, रामटेक, हिंगणा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, पांढुर्णा, मौदा, नेरगाव पेठ, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, चिपूर, भिसी आदी परिसरातील शाखांचा सहभाग राहणार आहे.

समता सैनिक दलाच्या पदाधिकारी, सैनिक तसेच विविध शाखांच्या वतीने सर्व बहुजन बांधव-भगिनींनी सहकुटुंब व सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहून बुद्ध-भीम गीतांचा आस्वाद घ्यावा, महापुरुषांचे विचार आत्मसात करावेत आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष : दि. ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत गंधकुटी  पर्वत( बुद्धभूमी ) बुद्ध दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments