Ticker

6/recent/ticker-posts

फुटक्या कालव्यातून पाणी सोडण्यास परवानगी?


सावरगाव कान्होबा धरणातील पाण्याच्या नासाडीचा शेतकऱ्यांचा आरोप; चौकशीची मागणी

दै लोकयुवा | प्रतिनिधी : एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व वाढले असताना, सावरगाव कान्होबा धरणातील उपलब्ध पाणीसाठा जीर्ण व गळक्या कालव्यातून सोडण्यास परवानगी देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मृदा व जलसंधारण विभागाच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सावरगाव कान्होबा लघु प्रकल्पावर परिसरातील शेती तसेच नागरिकांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न अवलंबून आहे. मात्र धरणातील कालव्यांची अनेक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नसल्याने ठिकठिकाणी कालवे फुटले असून अस्तरीकरणही खराब झाले आहे. त्यामुळे कालव्यातून सोडलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याआधीच मोठ्या प्रमाणात झिरपण्याची व वाया जाण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, धरणातील पाणी वापराबाबत संबंधित उपअभियंत्यांकडून लेखी परवानगी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कालव्याची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा, पाणी वापराचे नियोजन आणि प्रत्यक्ष सिंचनक्षमता याबाबत तांत्रिक पाहणी झाली होती का, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, धरणातून विद्युत कृषी पंपाने पाणी घेणाऱ्या मोजक्या शेतकऱ्यांची वीज जोडणी प्रशासनाच्या आदेशानुसार तोडण्यात आल्याचेही सांगण्यात येते. अशा परिस्थितीत कालव्याद्वारे पाणी सोडण्याच्या निर्णयाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांची मागणी : कालव्यांची तातडीने दुरुस्ती करावी, उपलब्ध पाणीसाठ्याचे जलअंकेक्षण करावे आणि पाणी नियंत्रित पद्धतीने वापरावे. तसेच परवानगी देताना नियमांचे पालन झाले का, याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments