Ticker

6/recent/ticker-posts

तेर येथे श्री संत बाळूमामांचा १३४ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा होणार


बालकीर्तनकार ह. भ. प. प्रणव महाराज तौर यांच्या भव्य कीर्तनाचे आयोजन

तेर प्रतिनिधी | धाराशिव

धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक नगरी असलेल्या तेर येथील खंडोबा मंदिर, तेर पेठ येथे जगाचे मालक व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री संत बाळूमामा यांच्या १३४ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे तेर परिसरातील भाविकांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सकाळी श्री संत बाळूमामा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. दुपारी ठीक ३ वाजून २३ मिनिटांनी श्रींच्या पालखीवर फुले व भंडारा उधळण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता श्रींची महाआरती होणार असून, त्यानंतर रात्री ८ वाजता भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कीर्तन सोहळ्यात आवाजाचे जादूगार बालकीर्तनकार ह. भ. प. प्रणव महाराज तौर (टाकळीकर) हे आपल्या कीर्तनातून भाविकांना आध्यात्मिक विचारांची मेजवानी देणार आहेत. या कार्यक्रमाला युवा कीर्तनकार ह. भ. प. श्रावणी ताई तौर आणि बालगायिका ह. भ. प. सृष्टी ताई तौर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

श्री संत बाळूमामा यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्याला तेरसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा व धार्मिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत बाळूमामा भक्तगण, तेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments