प्रतिनिधी बोरगाव जय गांगुर्डे
नांदुरी गडाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भरधाव कारने धडक दिल्याची भीषण घटना १८ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १.४० वाजण्याच्या सुमारास नांदुरी-अभोणा टी-पॉईंटजवळ घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, अन्य पोलीस कर्मचारी आणि भाविक जखमी झाले आहेत.
नांदुरी गडाच्या बंदोबस्तासाठी अभोणा टी-पॉईंट येथे रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर तैनात होते. यामध्ये एपीआय दिनकर मुंडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड आणि हेड कॉन्स्टेबल सचिन राऊत यांचा समावेश होता.
दरम्यान, नाशिकच्या दिशेने येणाऱ्या मारुती सियाज कार क्रमांक MH 12 ML 7747 ने अभोणा टी-पॉईंटच्या सुमारे ५०० मीटर आधी स्पीड ब्रेकरजवळ एका मोटारसायकलस्वाराला धडक दिली. त्यानंतर ही कार चुकीच्या बाजूने येऊन समोरून येणाऱ्या MH 15 KU 8895 क्रमांकाच्या कारच्या चालकाच्या बाजूला धडकली. पुढे रस्त्याच्या मध्यभागी लावलेल्या पोलीस बॅरिकेड्सला धडक देत या कारने बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही धडक दिल्याची माहिती आहे.
या अपघातात एपीआय दिनकर मुंडे यांच्या पायाच्या पंजाला दुखापत झाली. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांच्या हनुवटीला व दोन्ही पायांना मार लागला असून, त्यांच्या कमरेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल सचिन राऊत यांच्या डाव्या पायाच्या पंजाला फ्रॅक्चर झाले आहे.
तसेच महापे, मुंबई येथील मोरेश्वर बाळू पाटील (वय ५२) यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्यांच्या पत्नी तेजस्वी यांच्यासह गोपाळ एकनाथ सोनवणे यांनाही दुखापत झाली आहे. सोनवणे यांच्या डोक्याला किरकोळ मार लागल्याची माहिती आहे
घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
या घटनेत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातस्थळी पंचनामा करून याप्रकरणी सविस्तर फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

0 Comments