Ticker

6/recent/ticker-posts

दुष्काळी परिस्थितीचे मृदा व जलसंधारण प्रशासनाला नाही गांभीर्य.



इंगलवाडीतील सदोष कोल्हापुरी बंधाऱ्यातून सगळे पाणी वाहून गेल्यावर करणार काय दुरुस्ती.


  दै.लोकयुवा|मानोरा -

 तालुक्यासह राज्यातील काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या भयावह आपत्तीने होरपळत असताना मृदा व जलसंधारण विभागाच्या प्रशासकीय नाकर्तेपणामुळे इंगलवाडी या गावातील गतवर्षी बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणी निकृष्ट फळींमधून झिरपून वाहून जात असल्याने या प्रकाराला मृदा व जलसंधारण विभाग गांभीर्याने घेत नसल्याचे उघड वास्तव समोर येत आहे.

 मानोरा तालुक्यातील इंगलवाडी हे गाव पुस नदीच्या काठावर वसलेले आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पाणी मिळावे व गावाची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी शासनाने काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून हिवरा इंगलवाडी या गावा दरम्यान दोन कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधले आहे. या बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढून शेतकरी सुजलाम सुफलाम झाला होता.

मात्र गेल्या वर्षांपासून या बंधाऱ्याच्या लोखंडी फळ्या  निकृष्ट दर्जाच्या असल्याने व त्याला रबरी बिडिंग न लावल्याने साठवलेले पाणी फळीतून झिरपून खाली वाहून जात आहे. बंधारे पूर्ण भरलेले असतानाही फळ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे.

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना प्रत्येक थेंब पाणी वाचवणे गरजेचे आहे. पण येथे साठवलेले हजारो लिटर पाणी रोज वाया जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत मृदा व जलसंधारण विभाग, मानोरा व वाशिम यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही अधिकारी फिरकत नसल्याचा आरोप होत आहे.

ज्या उद्देशासाठी हे बंधारे बांधले, तोच उद्देश निकृष्ट फळीच्या नाकर्तेपणामुळे फसला आहे. पावसाळा संपल्याने हे पाणी पूर्णपणे वाहून जायला लागल्याने गावावर व परिसरात पाणीटंचाईचे संकट उडवण्याची चिन्हे आहेत.


शेतकऱ्यांची मागणी 

या दोन्ही कोल्हापुरी बंधाऱ्याच्या फळ्यांची तात्काळ दुरुस्ती करून त्याला नवीन रबरी बिडिंग व लोखंडी गॅसकेट बसवावे.

निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी.

बंधाऱ्याचे पाणी वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात फळ्यांना मातीचे व सिमेंटचे प्लास्टरिंग करावे.

या गंभीर बाबीकडे पालकमंत्री व जिल्हाधिकारी साहेबांनी जातीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी इंगलवाडी वासियांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments