Ticker

6/recent/ticker-posts

आरोहणच्या वर्धापनदिनानिमित्त २५ मान्यवरांचा ‘आशा किरण’ पुरस्काराने गौरव



दैनिक लोकयुवा पालघर  जिल्हा प्रतिनिधी फैजान खान

जव्हार: ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण, कृषी आणि सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २५ व्यक्ती, समूह आणि संस्थांचा आरोहण संस्थेतर्फे शनिवारी ‘आशा किरण पुरस्कार वर्ष ४’ प्रदान करून गौरव करण्यात आला. संस्थेच्या १२व्या वर्धापनदिनानिमित्त जव्हार येथील साई महल हॉलमध्ये हा सोहळा उत्साहात पार पडला.

   कार्यक्रमाचे उद्घाटन विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोहण संस्थेच्या सचिव हेलन जोसेफ, संचालिका अंजली, विश्वस्त दिनेश आहेर व शुभलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल सोनावणे आदी उपस्थित होते. पारंपरिक तारपा नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. वृक्षाला पाणी अर्पण करून पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच आरोहण संस्था आणि जव्हार कुटीर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यात २३ नागरिकांनी रक्तदान केले.

   मोखाडा, जव्हार आणि डहाणू तालुक्यांतील ग्राम आरोग्य, पोषण व पाणीपुरवठा समित्या, आदर्श शिक्षक, रोजगार सेवक, प्रगतिशील शेतकरी, अंगणवाडी सेविका, शाळा व्यवस्थापन समित्या, पाडा समित्या आणि स्वयंसहायता गटांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

आमदार भोये यांनी आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील आरोहणच्या कार्याचे कौतुक केले. दुर्गम भागाच्या विकासासाठी संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक विकासकामांतील सहकार्याबद्दल न्याहाळेचे सरपंच नरेश पढेर यांनी संस्थेचे आभार मानले. पुरस्कारार्थींच्या निःस्वार्थ कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे दिनेश आहेर यांनी सांगितले.

   स्थानिक पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळवून देणे, हा पुरस्कार उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या सन्मानामुळे ग्रामीण विकासासाठी कार्यरत व्यक्ती व समूहांना नवी प्रेरणा मिळाली असे सन्मान झालेल्या व्यक्तींनी सांगितले.

Post a Comment

0 Comments