पालघर जिल्हा प्रतिनिधी फैजान खान:
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड या चार तालुक्यांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पावसाने ओढ दिल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, तातडीने पाहणी करून दुष्काळ जाहीर करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी पी. के. सिद्धार्थ रामकुमार यांची भेट घेऊन सोमवारी शिष्टमंडळासह निवेदन सादर केले.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे संबंधित अधिकारी आणि तहसीलदार यांनाही देण्यात आल्या आहेत. पावसाच्या खंडामुळे भात, नागली, वरई, उडीद आणि तूर या प्रमुख पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतीसाठी बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर खर्च करूनही अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक कुटुंबांचे उपजीविकेचे प्रमुख साधन शेती असल्याने या नुकसानीचा त्यांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करावी, नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेऊन नियमानुसार मदत मंजूर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या वेळी धानोशीचे सरपंच विष्णू पवार, आपटाळे ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास पागी, साकुरचे सरपंच सुनील वळवी, धानोशीचे उपसरपंच भगवान पागी, कौलाळेचे माजी सरपंच सुभाष मुर्थडे, सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments