प्रलंबित प्रश्नांवर १० दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन; मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थी प्रतिनिधींचा पाठपुरावा सुरूच
धडगाव प्रतिनिधी:अर्जुन पावरा
यावल : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात यावल येथील प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यासोबत आज सकारात्मक चर्चा पार पडली. या बैठकीत विद्यार्थी प्रतिनिधी जयेश पावरा, अविनाश पावरा, किरण पावरा आणि रायसिंग वसावे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत विविध मागण्या ठामपणे मांडल्या.
विद्यार्थ्यांच्या समस्यांवर चर्चा करताना प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी संबंधित मागण्यांबाबत पुढील १० दिवसांच्या आत आवश्यक कार्यवाही करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षा निर्माण झाली आहे.
दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची निश्चित कालमर्यादेत पूर्तता होणे आणि मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे महत्त्वाचे असल्याची भूमिका विद्यार्थी प्रतिनिधींनी मांडली. केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर अंतिम निर्णय होऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार, असा निर्धार विद्यार्थी प्रतिनिधींनी व्यक्त केला. आता प्रशासन या आश्वासनाची कितपत आणि किती वेळेत पूर्तता करते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे

0 Comments