Ticker

6/recent/ticker-posts

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजारांची मदत द्या; अन्यथा नाशिक ते मुंबई बिऱ्हाड महामोर्चा!



*सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; वनहक्क दाव्यांचा निपटारा, सातबारा उतारा आणि कष्टकऱ्यांना मासिक अनुदान देण्याची मागणी*


दैनिक लोक युवा नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह :- 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, भूमिहीन शेतमजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांना दरमहा ५ हजार रुपये जीवननिर्वाह अनुदान द्यावे, तसेच प्रलंबित वनहक्क दाव्यांचा तातडीने निपटारा करून पात्र वनहक्कधारकांना सातबारा उतारा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेलाही विरोध करण्यात आला. मोर्चानंतर निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

*पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान; शेतकरी आर्थिक संकटात*

नंदुरबार व धुळे जिल्ह्यांमध्ये पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, भात, कपाशी आणि तूर या पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याबरोबरच वनहक्क दावे दाखल केलेल्या पात्र दावेदारांनाही नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

*प्रलंबित वनहक्क दाव्यांचा निपटारा करून सातबारा उतारा द्या!*

जिल्हास्तरीय वनहक्क समितीने फेटाळलेले दावे तसेच प्रलंबित वनहक्क दाव्यांचा फेरविचार करून तातडीने निपटारा करावा. यासाठी संबंधित क्षेत्रांची प्रत्यक्ष स्थळपाहणी व जीपीएस मोजणी करण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा. पात्र वनहक्कधारकांना सातबारा उतारा आणि फार्मर आयडी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संघटनेने केली.

      तसेच, १० सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयाची (जीआर) अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना मालकी हक्क सिद्ध करणारा सातबारा उतारा देण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

       शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना कराव्यात, शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ द्यावा आणि शेतमालाला हमीभाव मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे प्रभावीपणे राबवून मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असेही संघटनेने म्हटले.

      भूमिहीन शेतमजूर आणि ग्रामीण कष्टकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये जीवननिर्वाह अनुदान देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

     आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमधील समस्या तातडीने सोडवाव्यात, ग्रामीण व आदिवासी भागात पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि घरकुलांचे प्रलंबित अनुदान लाभार्थ्यांना वितरित करावे, अशी मागणी करण्यात आली.

       याशिवाय बिरसा मुंडा योजनेंतर्गत विहिरींची कामे पूर्ण होऊन एक ते दीड वर्षाचा कालावधी उलटला असतानाही संबंधित लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसल्याचा मुद्दा संघटनेने उपस्थित केला. या लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करावे, अशी मागणी करण्यात आली.

    मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान पात्र नागरिकांची नावे मतदारयादीतून वगळली जाऊ नयेत, अशी भूमिका घेत संघटनेने या प्रक्रियेलाही विरोध दर्शविला.

      संघटनेच्या मागण्यांची २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अंमलबजावणी न झाल्यास नाशिक ते मुंबई पायी बिऱ्हाड महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यापूर्वी २०२३ मध्ये स्थगित करण्यात आलेला बिऱ्हाड महामोर्चा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

      नवापूर चौफुली येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हातात लाल झेंडे घेऊन सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांच्या घोषणा देत भर उन्हातही शासनाचे लक्ष वेधले.

      या मोर्चात कॉम्रेड आर. टी. गावीत, कॉम्रेड विक्रम गावीत, कॉम्रेड शीतल गावीत, कॉम्रेड मनिलाताई गावीत, कॉम्रेड सुरेखा पाडवी, कॉम्रेड देऊबाई वळवी, कॉम्रेड मनोहर वळवी, कॉम्रेड रवी वळवी, कॉम्रेड बांबूराव ठाकरे, कॉम्रेड चिंतामण पाडवी, कॉम्रेड काशिनाथ कोकणी, कॉम्रेड किसू वळवी, कॉम्रेड सेल्या गावीत, मंगल वळवी, कॉम्रेड ईश्वर वळवी, कॉम्रेड अरुण वळवी, दिवाणजी नाईक, कॉम्रेड उत्तम गावीत आणि कॉम्रेड रेहमू गावीत यांच्यासह संघटनेचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments