नंदुरबार तालुका (प्रतिनिधी) :-*योगेश बच्छाव
*आरोग्य सेवांचा घेतला आढावा; नवीन इमारत व कर्मचारी निवासस्थानांच्या कामाचीही पाहणी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भाप्रसे) यांनी दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी कोपर्ली (ता. जि. नंदुरबार) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांचा आढावा घेतला.
यावेळी आयुष्मान भारत कार्ड वितरण, बालक व मातांचे लसीकरण, सिकलसेल तपासणी, प्रसूती सेवा तसेच गंभीर रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली जाणारी संदर्भ सेवा (रेफरल सर्व्हिसेस) यांसह विविध आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती घेतली. संबंधित नोंदी व अभिलेखांचीही त्यांनी पाहणी करून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
नवीन इमारत व कर्मचारी निवासस्थानांची पाहणी
आरोग्य सेवांचा आढावा घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारण्यात येत असलेली नवीन मुख्य इमारत तसेच कर्मचारी निवासस्थानांच्या सुरू असलेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी बांधकामाच्या कामाचा दर्जा, प्रगती आणि कामाची गती याबाबत संबंधितांकडून माहिती घेतली. बांधकामाची कामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या आकस्मिक भेटीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा, नोंदी आणि सुरू असलेल्या बांधकाम कामांना अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे.

0 Comments