माजी पं.स. सदस्य विजय पाटील यांची सीईओंकडे हस्तांतरणाची मागणी
लोकयुवा मानोरा:(ता.प्र.)
(वाशिम) श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पोहरादेवी येथे शासनाच्या निधीतून बांधण्यात आलेले नंगारा भवन - वस्तु संग्रहालय अद्याप हस्तांतरणाच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीचे महसूल बुडत असून आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार माजी पंचायत समिती सदस्य विजय अनंतकुमार पाटील यांनी केली आहे.
श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखडा - पोहरादेवी-उमरी अंतर्गत पोहरादेवी येथे नंगारा भवनाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हे भवन हस्तांतरणासाठी तयार असतानाही अद्याप जिल्हा परिषद स्तरावरून त्याची हस्तांतरण प्रक्रिया झालेली नाही. यासंदर्भात माजी पं.स. सदस्य विजय पाटील यांनी दि. ०७/०८/०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिम यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, "कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांनी दि. ०१/०७/०२६रोजी जा.क्र. ३९७९ प्रमाणे पत्र सीईओ कार्यालयाला पाठवले आहे. ते पत्र दि. ०२/०७/०२७ रोजी कार्यालयात प्राप्तही झाले आहे. मात्र त्यानंतरही हस्तांतरणाबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही."
या दिरंगाईमुळे जिल्हा परिषद व ग्रामपंचायत पोहरादेवी यांचे महसूल बुडत आहे आणि शासकीय मालमत्तेचे आर्थिक नुकसान होत आहे.
हस्तांतरणाची तातडीने प्रक्रिया करावी - मागणी
विजय पाटील यांनी सीईओंकडे मागणी केली आहे की, "आपण जातीने लक्ष घालून नंगारा भवन अर्थात वस्तु संग्रहालय, बंजारा विरासत पोहरादेवी याचे हस्तांतरण करण्याची त्वरित प्रक्रिया करावी." सोबत दि. ०१/०७/०२६ रोजीचे कार्यकारी अभियंता यांचे पत्र आणि त्यासोबतचे दस्तऐवजही त्यांनी जोडले आहेत. तीर्थक्षेत्राचा विकास आणि बंजारा समाजाच्या वारशाचे जतन करण्यासाठी हे भवन लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

0 Comments