जव्हार प्रतिनिधी-
गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित के. व्ही. हायस्कूल व आर. वाय. ज्युनिअर कॉलेज, जव्हार येथे जागतिक आदिवासी दिन विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व पारंपरिक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवाने संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरत आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृतीचा, निसर्गाशी असलेल्या घट्ट नात्याचा आणि पारंपरिक ज्ञानसंपदेचा अनोखा परिचय उपस्थितांना करून दिला.
कार्यक्रमासाठी पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले, तर ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक मनोज कामडी यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते रानभाज्या व औषधी वनस्पती प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. त्यानंतर विद्यालयाच्या कलादालनात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य रवी कांबळे सर यांच्या हस्ते पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रमुख वक्ते मनोज कामडी यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. रानभाज्या व औषधी वनस्पती प्रदर्शनाचे परीक्षण करणारे गोविंद लहानु गायकवाड सर, दत्तू गावित सर, प्रगतशील शेतकरी व माजी मुख्याध्यापक गणपत भाऊ गावंढा सर तसेच सीता गणपत गावंढा यांचा विद्यालयाचे पर्यवेक्षक बाचकर सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय महाविद्यालयाचे माणिक पुंडलिक चौधरी सर यांनी करून दिला. त्यांनी पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांच्या सामाजिक कार्याचा तसेच आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाचा परिचय उपस्थितांना करून दिला.
रानभाज्या महोत्सवात विद्यार्थ्यांनी जंगलात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या विविध रानभाज्या पारंपरिक पद्धतीने तयार करून त्यांचे आकर्षक प्रदर्शन भरविले. प्रत्येक गटाने आपल्या मातृभाषेत त्या रानभाज्यांचे औषधी गुणधर्म, पौष्टिक मूल्य, आरोग्यदायी उपयोग आणि पारंपरिक पाककृती अत्यंत आत्मविश्वासाने मांडल्या. याशिवाय विविध औषधी वनस्पतींचे प्रदर्शन भरवून त्यांच्या औषधी उपयोगांची माहितीही उपस्थितांना देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या संशोधनपर मांडणीने सर्व मान्यवर प्रभावित झाले.प्रदर्शनाचे परीक्षण गोविंद गायकवाड सर, दत्तू गावित सर, गणपत गावंढा सर व सीता गावंढा मॅडम यांनी करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले व आवश्यक मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते मनोज कामडी यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व, आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, शिक्षणाची गरज, पर्यावरण संवर्धन, पारंपरिक ज्ञानाचे जतन आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची जबाबदारी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यानंतर प्रमुख अतिथी पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांनी आपल्या मनोगतात आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा, लोककला, निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि जीवनमूल्ये यांचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक शिक्षणासोबत आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून ती पुढील पिढ्यांपर्यंत जपण्याचे प्रेरणादायी आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
विद्यालयाचे प्राचार्य रवी कांबळे सर यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, आरोग्यदायी जीवनशैली आणि सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान निर्माण होतो, असे प्रतिपादन केले.सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी लोककला, पारंपरिक नृत्य व सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. आदिवासी पारंपरिक वेशभूषा स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सांगता पारंपरिक तारपा नृत्याने करण्यात आली. इयत्ता नववी-दहावी तसेच आर. वाय. ज्युनिअर कॉलेजच्या अकरावी-बारावीच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक आदिवासी वेशभूषेत सादर केलेल्या मनमोहक तारपा नृत्याने संपूर्ण परिसर आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी नटून गेला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थिनींच्या उत्कृष्ट सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सकाळ सत्राचे सत्रप्रमुख धनंजय काशीराम दळवी सर, दुपार सत्राचे सत्रप्रमुख राहुल विष्णू घाणे तसेच आर. वाय. ज्युनिअर कॉलेजच्या सत्रप्रमुख श्रीमती शितल अहिरे मॅडम यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे पर्यवेक्षक बाचकर सर यांनी प्रमुख अतिथी, मान्यवर, परीक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे आभार मानले. माननीय प्राचार्यांच्या परवानगीने जागतिक आदिवासी दिन व रानभाज्या महोत्सवाचा हा संयुक्त उपक्रम ज्ञान, संस्कृती, परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देत उत्साहपूर्ण व संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.

0 Comments