Ticker

6/recent/ticker-posts

महसूल दिनी माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांचा ‘उत्कृष्ट तहसीलदार’ पुरस्काराने गौरव


श्रीक्षेत्र माहूर (अपील बेलखोडे): 

माहूर तालुक्याचे तहसीलदार अभिजीत जगताप यांची सन २०२६ च्या ‘उत्कृष्ट तहसीलदार’ म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांच्या उल्लेखनीय व लोकाभिमुख कार्याची दखल घेत महसूल दिनानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दि. ६ ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील कै. शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय महसूल दिन कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात माहूर तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी सिद्धार्थ कुलदीपके यांचाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. यावर्षीही विविध निकषांच्या आधारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केलेले लोकाभिमुख प्रशासन, प्रभावी महसूल वसुली, शासनाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी, आपत्ती व्यवस्थापनातील तत्परता, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण तसेच कार्यालयीन कामकाजातील पारदर्शकता, शिस्त आणि कार्यक्षम व्यवस्थापन या बाबींची विशेष दखल घेण्यात आली. या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना ‘उत्कृष्ट तहसीलदार’ हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला.

तहसीलदार जगताप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, महसूल प्रकरणांचा वेळेत निपटारा, नैसर्गिक आपत्तीच्या काळात तत्पर प्रशासन तसेच सर्वसामान्य नागरिकांना जलद व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे माहूर तहसील कार्यालयाची कार्यक्षमता अधिक सक्षम झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

याच कार्यक्रमात सहाय्यक महसूल अधिकारी सिद्धार्थ कुलदीपके यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला. महसूल विभागातील विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सन्मानामुळे माहूर तहसील कार्यालयाच्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदार अभिजीत जगताप व सहाय्यक महसूल अधिकारी सिद्धार्थ कुलदीपके यांच्या सन्मानाबद्दल माहूर तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments