राहुरी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने, मा. आमदार श्री. विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर–करंजी पायी दिंडीतील वारकरी बांधवांसाठी ‘चरण सेवा’ हा सेवाभावी उपक्रम भक्तिभावाने पार पडला. या उपक्रमात युवा सेवकांनी दिवसभर पायी चालून आलेल्या वारकऱ्यांच्या थकलेल्या चरणांची सेवा करून संतपरंपरेतील सेवा, समर्पण आणि माणुसकीचा संदेश दिला.
ह.भ.प. संगीताताई करंजीकर व ह.भ.प. हर्षाताई जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पायी दिंडीमध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. वारकरी बांधवांची सेवा करताना त्यांनी निःस्वार्थ सेवाभावाचे दर्शन घडविले.
या सेवाभावी उपक्रमात मा. आमदार श्री. विवेकभैय्या कोल्हे यांनीही युवा सेवकांसमवेत वारकऱ्यांची चरण सेवा करत प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. "सेवा हाच धर्म" या ब्रीदवाक्याला कृतीतून अधोरेखित करत त्यांनी युवकांसमोर सेवाभाव, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवला. त्यांच्या सहभागामुळे युवा सेवकांमध्ये समाजसेवेची प्रेरणा अधिक बळकट झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
पायी दिंडीचा आजचा मुक्काम मा. दिनकर अण्णासाहेब पाटील आगवण यांच्या राहुरी येथील निवासस्थानी होता. यावेळी आगवण परिवाराने वारकरी बांधव, मान्यवर आणि युवा सेवकांचे आत्मीयतेने स्वागत करून आदरातिथ्य केले. त्यांच्या सहकार्याबद्दल संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
समाजात सेवाभाव, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने संजीवनी युवा प्रतिष्ठान विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असून, युवकांमध्ये राष्ट्रसेवा आणि समाजसेवेची प्रेरणा जागविण्याचे कार्य करत आहे.
यावेळी सर्व वारकरी बांधवांची वारी सुखरूप पूर्ण होवो तसेच विठ्ठल-रखुमाईची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहो, अशी प्रार्थना करण्यात आली.

0 Comments