Ticker

6/recent/ticker-posts

पावसा... आता तरी ये! वैजापूर तालुक्यात पावसाअभावी खरीप पिके सुकू लागली; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू,....



वैजापूर (प्रतिनिधी): अर्जुन शिंदे 

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने वैजापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. २४ ते २५ जून रोजी झालेल्या पावसावर विश्वास ठेवून हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, कापूस, बाजरी तसेच इतर खरीप पिकांची पेरणी व लागवड केली. परंतु त्यानंतर तब्बल १५ ते २० दिवस उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतातील हिरवीगार पिके आता डोळ्यादेखत सुकू लागली आहेत.

सकाळी शेतात जाणारा शेतकरी आपल्या पिकांकडे आशेने पाहतो, मात्र प्रत्येक दिवसागणिक वाळत चाललेल्या रोपांकडे पाहून त्याचे मन हेलावून जाते. ज्यांच्या भरवशावर संपूर्ण वर्षाचा संसार चालतो, तीच पिके आता पाण्याअभावी करपू लागल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद नाहीसा झाला आहे. अनेक शेतकरी रोज आकाशाकडे नजर लावून बसले आहेत. काळे ढग दिसतात, पण पाऊस पडत नाही. त्यामुळे चिंता आणखी वाढत आहे.

यंदा बियाणे, खते, औषधे, मशागतीचा खर्च आणि मजुरी यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढले आहे. अनेकांनी उसनवारी करून शेती केली. आता पाऊसच न झाल्यास हे सर्व पैसे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. पिके हातची गेली तर कर्ज कसे फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, मुलांचे शिक्षण कसे चालवायचे, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यासमोर उभा आहे.

जमिनीतील ओलावा पूर्णपणे कमी झाल्याने सोयाबीनची रोपे पिवळी पडत आहेत, मका सुकू लागला आहे, तर कापसाची वाढ खुंटली आहे. काही भागात दुबार पेरणीचे संकटही निर्माण होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. पुन्हा पेरणी करावी लागल्यास त्यासाठी लागणारा अतिरिक्त खर्च परवडणारा नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

तालुक्यातील शेतकऱ्यांचे एकच म्हणणे आहे – "आम्हाला मदत नको, फक्त वेळेवर पाऊस हवा." निसर्गाने साथ दिली तर शेतकरी कोणत्याही संकटावर मात करू शकतो; मात्र सततची पावसाची अनिश्चितता त्याला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचवत आहे.

शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन कृषी विभागामार्फत तातडीने पाहणी करावी, आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

सध्या वैजापूर तालुक्यातील हजारो शेतकरी आकाशाकडे आशेने पाहत आहेत. त्यांच्या ओठांवर एकच प्रार्थना आहे – "देवा, आता तरी पाऊस पाड... आमची पिके वाचव

Post a Comment

0 Comments