{नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेखअनिस}
नांदेड |आर्धापूर रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणारी आणि माणुसकीला हादरवून सोडणारी घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे उघडकीस आली आहे. भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या 65 वर्षीय वृद्धाचा त्यांच्याच मुलाने धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्धापूर शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आज पहाटे एका व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक माणिक बेदरे, पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान मृताची ओळख सखाराम नामदेव पातळे (वय 65)अशी पटली.सखाराम पातळे हे अर्धापूर न्यायालयाजवळील टीनशेडमध्ये वास्तव्यास होते.भंगार गोळा करून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नावर त्यांचा संसार चालत होता. आयुष्यभर कष्ट करून जगणाऱ्या या वृद्धाचा शेवट मात्र अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी ठरला.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सखाराम पातळे यांच्या मुलानेच धारदार शस्त्राने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर मयताचे अन्य दोन मुल पोलीस ठाण्यात दाखल झाले असून पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाईला वेग दिला आहे.आरोपीने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले,याचा सखोल तपास सुरू आहे.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून "ज्यांच्या आधारासाठी आयुष्यभर कष्ट केले,त्याच मुलाच्या हातून मृत्यू"ही बाब प्रत्येकाला अस्वस्थ करणारी ठरत आहे.आर्थिक विवंचना, कौटुंबिक वाद किंवा इतर कोणते कारण या घटनेमागे आहे,याचा उलगडा तपासानंतरच होणार आहे.
रक्ताच्या नात्यांमध्ये वाढणारा अविश्वास आणि क्षणिक रागातून घडणारे हिंसक प्रकार समाजासाठी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहेत.रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करतो,तर माणुसकीलाही काळिमा फासतो.या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सत्य समोर येण्याची प्रतीक्षा आहे...!

0 Comments