Ticker

6/recent/ticker-posts

चिखली (मैना) येथे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीवर कृषी विभागाचे मार्गदर्शन; शेती शाळेचा शुभारंभ...!



चिखली (मैना), ता. काटोल :

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून चिखली (मैना) येथे शेतकरी गटांसाठी सेंद्रिय शेती विषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी तथा कृषी भूषण पुरस्कार प्राप्त मा. श्री. प्रशांतजी वानखेडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व, कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याच्या पद्धती, मातीचे आरोग्य जपण्याचे उपाय तसेच नैसर्गिक शेतीच्या विविध तंत्रांची सोप्या व शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत सविस्तर माहिती दिली.

यावेळी त्यांनी पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेची उद्दिष्टे, नियम व शेतकरी गटांच्या सहभागाचे महत्त्व याविषयीही मार्गदर्शन केले. गावामध्ये प्रत्येक महिन्यातून एकदा 'शेती शाळा' आयोजित करण्यात येणार असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीतील विविध समस्यांचे निराकरण, शासकीय कृषी योजनांची माहिती, आधुनिक व सेंद्रिय शेती तंत्रज्ञान तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन नियमितपणे मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी शेतीविषयक जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करून कमी खर्चात प्रगत व शाश्वत शेती करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या सहकार्याने शेतकरी गटांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचा प्रसार करून गावातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम, सुखी, समृद्ध आणि प्रगतशील करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न, आधुनिक ज्ञान आणि सेंद्रिय शेतीचा स्वीकार करून समृद्ध शेतीकडे वाटचाल करावी, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.


Post a Comment

0 Comments