श्रीक्षेत्र माहूर (अपील बेलखोडे)
रब्बी पणन हंगाम २०२५–२६ अंतर्गत किनवट व माहूर या आदिवासी व दुर्गम तालुक्यांतील धान/भरडधान्य शासकीय खरेदीस तात्काळ मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
किनवट व माहूर तालुक्यांमध्ये शासकीय धान/भरडधान्य खरेदी प्रक्रिया उशिराने सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांना विहित मुदतीत आपला माल खरेदी केंद्रावर विक्री करता आला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आजही अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात धान/भरडधान्य शिल्लक असून, खरेदीची मुदत संपल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे.
आदिवासी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना वाहतूक, नोंदणी तसेच खरेदी प्रक्रियेदरम्यान विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या विशेष परिस्थितीचा विचार करून शासनाने शासकीय खरेदीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार केराम यांनी केली आहे.
उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना हमीभावाने धान/भरडधान्य विक्रीची संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी निवेदनातून केली आहे.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, नांदेड यांनाही पाठविण्यात आली आहे. दरम्यान, शासनाकडून मुदतवाढीबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

0 Comments