श्रीक्षेत्र माहूर (अपील बेलखोडे)

किनवट विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित व नियमित बससेवा उपलब्ध व्हावी तसेच दुर्गम व आदिवासी भागातील प्रवाशांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे किनवट व माहूर बस आगारांना प्रत्येकी १० "जिजाऊ" बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
याबाबत परिवहन मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आमदार केराम यांनी नमूद केले आहे की, नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर हे तालुके भौगोलिकदृष्ट्या दुर्गम, आदिवासीबहुल तसेच धार्मिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकामाता शक्तीपीठाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचा दैनंदिन प्रवास प्रामुख्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेवर अवलंबून आहे.
सध्या किनवट व माहूर आगारांमध्ये बसांची संख्या अपुरी असल्याने अनेक मार्गांवर बसफेऱ्या कमी आहेत. परिणामी प्रवाशांना गर्दी, विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागत असून अनेक दुर्गम गावांतील नागरिकांना नियमित बससेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर दोन्ही आगारांना प्रत्येकी १० आधुनिक "जिजाऊ" बसेस उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळेल. यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याबरोबरच धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल आणि स्थानिक सामाजिक व आर्थिक विकासाला गती मिळेल, असे आमदार केराम यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, परिवहन विभागाने या मागणीची सकारात्मक दखल घेऊन किनवट व माहूर बस आगारांना लवकरात लवकर प्रत्येकी १० "जिजाऊ" बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा मतदारसंघातील नागरिकांनी व्यक्त आहे