Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता जिजाऊ बससेवेच्या गाड्यांची स्वच्छता व देखभाल सुधारण्याची मागणी; प्रवाशांच्या तक्रारींमुळे कल्याण आगाराला निवेदन



कल्याण, प्रतिनिधी :तानाजी किर्दत 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कल्याण आगारातून राज्याच्या विविध भागांत धावणाऱ्या "राजमाता जिजाऊ" बससेवेतील काही गाड्यांच्या स्वच्छता व देखभालीबाबत प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आगार व्यवस्थापक, कल्याण आगार यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजमाता जिजाऊ बससेवा ही महामंडळाची एक महत्त्वाची व लोकप्रिय सेवा असून दररोज हजारो प्रवासी या सेवेचा लाभ घेत असतात. महिला, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक तसेच लांब पल्ल्याचा प्रवास करणारे अनेक प्रवासी या सेवेवर अवलंबून आहेत. मात्र, काही गाड्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बसच्या आतील भागात धूळ साचलेली असणे, आसनांची अस्वच्छ अवस्था, खिडक्यांची अपुरी स्वच्छता, कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणे तसेच बसच्या आतील व बाहेरील भागाची नियमित साफसफाई होत नसल्याचे चित्र अनेकदा पाहावयास मिळत आहे. काही ठिकाणी बसमध्ये दुर्गंधीची समस्या निर्माण होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही संघटनेने निदर्शनास आणून दिले आहे.

"राजमाता जिजाऊ" हे नाव महाराष्ट्राच्या इतिहासाशी, संस्कृतीशी आणि स्वाभिमानाशी निगडित आहे. त्यामुळे या नावाने धावणाऱ्या बससेवेत स्वच्छता, सुरक्षितता, शिस्त आणि दर्जेदार सुविधा यांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. बसची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण, आसनांची तपासणी, खिडक्या व इतर सुविधांची देखभाल तसेच प्रत्येक फेरीनंतर स्वच्छतेची खात्री करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

याशिवाय बस आगारातून गाडी सुटण्यापूर्वी स्वच्छता तपासणीसाठी स्वतंत्र जबाबदार अधिकारी नियुक्त करावेत, स्वच्छतेबाबत नियमित निरीक्षण करावे आणि प्रवाशांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणे ही महामंडळाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

प्रवाशांच्या आरोग्य, सुरक्षितता व सोयीच्या दृष्टीने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा प्रवाशांमधील असंतोष वाढण्याची शक्यता असल्याचे छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी म्हटले आहे. तसेच राजमाता जिजाऊ बससेवेची प्रतिष्ठा व प्रवाशांचा विश्वास कायम राखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments