*अवैध गुट्खा विक्रेत्यांवर पोलिसांचा धडक कारवाई*
बिलोली प्रतीनीधी विनोद वाघमारे
बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सगरोळी येथे करण्यात आलेल्या धडक कारवाईत एका किराणा दुकानातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा टखा व पानमसाला जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांना गुप्त बातमीदारामार्फत सगरोळी येथील लालू पोशिटी पोलसवाड हा आपल्या किराणा दुकानात अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहितीची तात्काळ दखल घेत त्यांनी विशेष पथकाला कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार सपोनि विजय दौलतराव जाधव, पोलीस कॉन्स्टेबल वच्चेवार व महिला पोलीस अंमलदार सोळंके यांनी दोन पंचांच्या उपस्थितीतदुकानावर छापा टाकला. झडतीदरम्यान विविध कंपन्यांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून नमुने रासायनिक विश्लेषणासाठी (सी.ए.) सीलबंद करण्यात आले, तर उर्वरित प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी लालू पोशिटी पोलसवाड (रा. सगरोळी, ता. बिलोली) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलम ५९ अन्वये बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली अवैध गुटखा विक्रेत्यांविरुद्ध सुरू सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

0 Comments