काटोल प्रतिनिधी :-
काटोल तालुक्यातील मौजा हातला येथील प्रगतिशील महिला शेतकरी सौ. शीतल प्रशांत वानखेडे यांना सेंद्रिय शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा 'जिजामाता कृषिभूषण पुरस्कार २०२४' प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल, कृषीमंत्री मा. दत्ताजी भरणे, मा. विखे पाटील, कृषी राज्यमंत्री मा. आशिषजी जैस्वाल, फलोत्पादन मंत्री मा. भरतजी गोगावले, कृषी आयुक्त तसेच कृषी सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला.
सौ. वानखेडे यांच्या शेताला PGS सेंद्रिय शेती प्रमाणपत्र प्राप्त झाले असून बीजोत्सव २०२४ मध्येही त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यात आला आहे. तसेच National Horticulture Board मान्यताप्राप्त नर्सरीद्वारे आंबा, सीताफळ, पेरू आणि लिंबूवर्गीय फळपिकांची दर्जेदार रोपे तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे कार्य त्या करीत आहेत. कीड व्यवस्थापनासाठी सापळ्यांचा वापर, मित्र कीटकांचे संवर्धन तसेच इन्सेक्ट झू (Insect Zoo) उभारणीसारखे अभिनव प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबविले आहेत.
या यशामागे पती मा. श्री. प्रशांत वानखेडे यांचे मोलाचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सहकार्य आणि प्रोत्साहन लाभल्याची भावना सौ. शीतल वानखेडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सेंद्रिय शेतीतील विविध उपक्रम यशस्वीपणे राबविणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
सौ. शीतल प्रशांत वानखेडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातील शेतकरी, सामाजिक संस्था, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

0 Comments