Ticker

6/recent/ticker-posts

शेकोस्पिन एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या गैरव्यवहाराची चौकशी वेगाने; सांगोला सहाय्यक निबंधकांना कारवाईचे आदेश



सांगोला ग्रामीण प्रतिनिधी.आण्णासाहेब खरात

शेकोस्पिन एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सांगोला येथील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी गतीने पूर्ण करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाकडून सांगोला येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांना देण्यात आले आहेत.

यासंदर्भात दि. १६ जुलै २०२६ रोजी अप्पर निबंधक (पतसंस्था) यांच्या स्वाक्षरीने अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. हे पत्र तक्रारदार श्री. बजरंग श्रीरंग पारसे (रा. सावे, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पाठविण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, शेकोस्पिन एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन, सचिव व संचालक मंडळाने संस्थेच्या कामकाजात गंभीर गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामध्ये सभासद कल्याण निधीचे वाटप, परत सेवक कल्याण निधीचे वितरण, लेखा नोंदीतील त्रुटी तसेच इतर आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीच्या आधारे यापूर्वीही संबंधित कार्यालयाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच शासनानेही या प्रकरणाचा स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

या प्रकरणी दि. २ एप्रिल, २६ मे आणि १७ जून २०२६ रोजी सुनावण्या घेण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या सुनावण्यांना सांगोला येथील सहाय्यक निबंधक, संस्थेचे प्रतिनिधी तसेच तक्रारदारांच्या वतीने प्रतिनिधी उपस्थित होते.

आता सहकार आयुक्त कार्यालयाने पुन्हा एकदा स्पष्ट निर्देश देत, तक्रारीतील सर्व मुद्द्यांवर सखोल सुनावणी घेऊन नियमानुसार योग्य ती कायदेशीर व कार्यवाही करून त्याचा अहवाल शासनास तसेच संबंधित कार्यालयास तातडीने सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

या पत्रामुळे शेकोस्पिन एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीतील कथित गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात असून, पुढील कारवाईकडे सभासद व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments