घोडेगाव / प्रतिनिधी सलीम इनामदार
दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी, युवक व सामाजिक कार्यकर्ते मागील २१ दिवसांपासून शांततापूर्ण उपोषण व आंदोलन करत आहेत. या आंदोलनामध्ये सहभागी असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध रुग्णालयात हलविण्यात आल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच संसदेसमोर होणाऱ्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आंबेगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून पाठिंबा व्यक्त करण्यात आला. आंबेगाव तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी व सामाजिक संघटनांच्या वतीने मा. तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करून महाराष्ट्र शासन व भारत सरकारकडे नीट पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी., परीक्षा प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात., शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांशी दडपशाही न करता संवाद साधण्यात यावा. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबाबत करण्यात आलेल्या कारवाईची निष्पक्ष
चौकशी करून त्यांच्या घटनात्मक अधिकारांचा सन्मान करण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आंदोलनाची योग्य दखल घ्यावी. या मागण्यांचे निवेदन मा. तहसीलदार सचिन वाघ यांना देण्यात आले. या निदर्शनांमध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेचे समीक्षा केदारी, मयूर हिले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक आप्पा काळे, नारायण हिले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे आदेश काळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेचे नेते राजू घोडे, दत्तात्रय खमसे, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे नेते अविनाश गवारी, दिपक वालकोळी, दिपाली खामकर, जनवादी महिला संघटनेच्या
नेत्या सुप्रिया मते, स्नेहल साबळे, बिरसा ब्रिगेड चे नेते संतोष तिटकारे, ज्ञानसाहिता अभ्यासिकेचे विद्यार्थी व अनेक नागरिक सहभागी झाले होते. निदर्शनांमध्ये अशोक काळे, राजू घोडे समीक्षा केदारी यांनी आपल्या भाषणांमधून आंदोलकांवर केल्या गेलेल्या दडपशाहीवरून केंद्र सरकारचा निषेध व युवकांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. या निदर्शनाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक डी वाय एफ आय युवा संघटनेचे सचिव अविनाश गवारी यांनी केले. निवेदन सादर केल्यानंतर शेवटी भारतीय लोकशाही जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद या घोषणा देऊन निदर्शनांचा समारोप झाला.

0 Comments