*मतदार यादी मॅपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव*
जालना / संतराम जाधव
*जालना, : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत सन 2002 पूर्वीच्या मतदार यादीतील मतदारांची नावे सध्याच्या मतदार यादीशी मॅपिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जालना जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व त्यांच्या पथकांचा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
*जालना जिल्ह्यात 80.52% मॅपिंग पूर्ण*
भारत निवडणूक आयोगाने 14 मे 2026 रोजी जाहीर केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार महाराष्ट्रासह 16 राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत बीएलओ घरभेटी देऊन मतदारांना गणना प्रपत्र वाटप, अर्ज भरण्यास सहाय्य व डिजिटायझेशनची प्रक्रिया राबवत आहेत.
जालना जिल्ह्यात 16 लाख 82 हजार 723 मतदार असून आतापर्यंत 13 लाख 54 हजार 924 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून त्याची टक्केवारी 80.52 आहे.
*मतदारसंघनिहाय आकडेवारी:*
- *100-घनसावंगी*: 3,28,606 पैकी 2,99,535 मॅपिंग - *91.15%*
- *99-परतूर*: 3,30,377 पैकी 2,87,310 मॅपिंग - *86.96%*
- *103-भोकरदन*: 3,26,167 पैकी 2,78,272 मॅपिंग - *85.32%*
- *102-बदनापूर*: 3,38,936 पैकी 2,86,409 मॅपिंग - *84.50%*
- *101-जालना*: 3,58,637 पैकी 2,03,398 मॅपिंग - *56.71%*
*पुढील टप्पे*
अभियानासाठी 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
*उत्कृष्ट बीएलओंचा सत्कार*
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार मॅपिंगचे काम प्रभावीपणे पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये शरद मुंढे, सुनिल गवई, श्रीमती कालिंदा दवंडे, श्रीराम बहीर, मुकेश गाडेकर, बी. आर. वाघमारे, रमेश मान्टे, श्रीमती शिवगंगा बारगाजे, दिपक मोहिते, शिवाजी ठाकूर, ए. पी. इंगळे या बीएलओंचा समावेश आहे.
मतदार यादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे असून, नागरिकांनी बीएलओना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0 Comments