हातकणंगले प्रतिनिधी :
आळते गणातून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. वर्षा अविनाश सावर्डेकर यांच्या सावर्डे येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी सावर्डेकर दाम्पत्याच्या समाजसेवेचा गौरव करताना सांगितले की, “आरोग्यसेवेच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केलेल्या सावर्डेकर दाम्पत्याने आता जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लोकसेवेचा नवा अध्याय सुरू केला आहे. या कार्यालयातून विकासाची गंगा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचेल. तब्बल चाळीस वर्षांनंतर सावर्डे गावाला जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्वाची संधी मिळाली आहे. या संधीचे सोनं करत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करावे.”अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अरुणराव इंगवले म्हणाले की, “हे जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरेल. जनतेच्या प्रश्नांसाठी हे कार्यालय कायम कार्यरत राहील.”
जिल्हा परिषद सदस्या डॉ. वर्षा सावर्डेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरत जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. जनसंपर्क कार्यालय हे जनतेसाठी सदैव खुले राहील आणि विकासकामांना गती देण्याचा माझा निर्धार आहे.”
या कार्यक्रमास जिल्हा परिषद बांधकाम सभापती सारिका नांदेकर, शिक्षण सभापती शीतल यादव, जि.प. सदस्या अर्चना निकम, वर्षा पाटील, आतिष शिंगे, शिवाजी जाधव, उपसभापती संतोष कांबळे, सरपंच अजिंक्य इंगवले, प्रविण यादव, बाबा नांदेकर, पंचायत समिती सदस्य सचिन जाधव, गौरी मिसाळ, माया लोखंडे, डॉ. अविनाश सावर्डेकर, अभिजीत भंडारी, रविंद्र अनुसे, विकास नाईक यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावर्डेच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनामुळे विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

0 Comments