श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने माहूर तालुका अल्पसंख्यांक आघाडीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मोबीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण सहभाग, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्षाच्या कार्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
मोबीन शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. अल्पसंख्यांक समाजातील युवकांना मुख्य प्रवाहात आणणे, समाजातील गरजू घटकांना मदत करणे तसेच पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
सन २०२१ मध्ये झालेल्या माहूर नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक १४ मधून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत त्यांचा अवघ्या चार मतांनी पराभव झाला होता. पराभवानंतरही त्यांनी जनसंपर्क आणि सामाजिक कार्याची कास सोडली नाही. उलट जनतेशी नाळ जोडून विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.
त्यांच्या या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तालुका अल्पसंख्यांक आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष संघटना अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

0 Comments