Ticker

6/recent/ticker-posts

महावितरणच्या बेफिकीरीची किंमत एका जीवाने चुकवली; वैजापूरात संतापाची लाट...



वैजापूर प्रतिनिधी : अर्जुन शिंदे .


वैजापूर तालुक्यातील बिलोणी शिवारात महावितरणच्या कथित बेफिकीरीमुळे एका ७१ वर्षीय वृद्धाचा तसेच दोन शेळ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (२६ जून) सायंकाळी घडली. बाळू शंकर वाघ (रा. बिलोणी) असे मृत वृद्धाचे नाव असून, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळू वाघ हे आपल्या शेळ्या चारण्यासाठी गट क्रमांक १८८ मधील शेतात गेले होते. त्यावेळी जमिनीवर तुटून पडलेल्या वीजतारेचा स्पर्श होताच त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत त्यांच्यासह दोन शेळ्यांचाही जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित वीजतार गेल्या तीन महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत शेतात पडून होती. याबाबत महावितरणकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वेळेत कारवाई झाली असती तर बाळू वाघ यांचा जीव वाचला असता, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच मृताच्या कुटुंबीयांना तातडीने योग्य आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेश मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीजतार तुटल्याचे सांगितले. मात्र ग्रामस्थांनी हा दावा फेटाळून लावत संबंधित तार तीन महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप केला आहे. तारा व खांब पडलेल्या अवस्थेतही वीजपुरवठा सुरू कसा राहिला, याची चौकशी सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. तपासानंतर अधिकृत माहिती जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मृत बाळू वाघ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना व नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर आघाडे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments