उत्पादन तारीख आणि एक्सपायरीशिवाय बाटल्यांची सर्रास विक्री; अन्न व औषध प्रशासन झोपेत का ?
*नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह -*
नंदुरबार जिल्ह्यात कॅमको कंपनीच्या कॅम्प ऑरेंजसह विविध फ्लेवरच्या शीतपेयांच्या बाटल्यांवर उत्पादनाची तारीख आणि एक्सपायरी तारीख नमूद नसतानाही त्या खुलेआम विक्रीस ठेवल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप होत असून अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील अनेक किराणा व शीतपेय विक्री करणाऱ्या दुकानांमधून कॅमको कंपनीच्या कॅम्प ऑरेंज व इतर फ्लेवरच्या बाटल्या खरेदी केल्यानंतर त्यावर उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट, बॅच क्रमांक यासारखी अत्यावश्यक माहिती नसल्याचे निदर्शनास आले आहे. अन्न सुरक्षा नियमांनुसार अशा माहितीशिवाय कोणतेही खाद्यपदार्थ किंवा पेय विक्रीस ठेवणे गंभीर बाब मानली जाते.
विशेष म्हणजे, या बाटल्या नेमक्या अधिकृत आहेत की बनावट, याबाबतही जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू आहे. जर या बाटल्या बनावट असतील तर त्या बाजारात कशा पोहोचल्या? आणि जर अधिकृत असतील तर त्यांच्यावर आवश्यक माहिती का नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागरिकांच्या मते, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा प्रकारच्या उत्पादनांची विक्री बिनधास्तपणे सुरू असून ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात शीतपेयांचे सेवन होत असल्याने या प्रकाराची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
आता नंदुरबार जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि अन्न सुरक्षा अधिकारी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित शीतपेयांचे नमुने जप्त करणार का? दोषींवर कारवाई होणार का? की हा प्रकारही इतर प्रकरणांप्रमाणे फाईलमध्येच दडपला जाणार? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात प्रशासनाने त्वरित कारवाई करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

0 Comments