Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यपृष्ठखताच्या पोत्यात वाळू-खडे; बोगस खतप्रकरणी चौकशीची मागणी, अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप



नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने खरेदी केलेल्या खताच्या पोत्यात वाळू व खडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित खत कंपनी, विक्रेते तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उमरी येथील श्री मातोश्री ॲग्रो एजन्सीमधून कुदळा येथील शेतकरी पंडितराव पाटील जाधव यांनी 'क्लासवन झिंकटेड सुपर फॉस्फेट' हे खत खरेदी केले. मात्र पोते उघडल्यानंतर त्यामध्ये खताऐवजी वाळू व खडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून बोगस खतांच्या विक्रीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) नायगाव तालुकाध्यक्ष गजानन पाटील होटाळकर यांनी कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी अमोल पेकम, मोहीम अधिकारी सचिन कपाळे आणि गुणनियंत्रण निरीक्षक लखमोड यांच्या भूमिकेचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किंवा संगनमतामुळे बोगस खतांचा व्यवसाय फोफावत असल्याचा आरोप त्यांनी केला.

होटाळकर यांनी निवेदनाद्वारे संबंधित खत कंपनी, विक्रेते आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कंपनीचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या प्रकरणाबाबत कृषी विभागाकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. चौकशीनंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





Post a Comment

0 Comments