Ticker

6/recent/ticker-posts

नंदुरबार शहरात घरकुल बांधून देण्याच्या मागणीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिपक पटेल यांचा पाठिंबा



 *नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह :-* 

        नंदुरबार शहरातील बेघर व गरजू नागरिकांना खोडाई माता परिसर व इमाम बादशाह टेकडी परिसरात मोफत घरकुल बांधून देण्यात यावे, या मागणीसाठी रविवार (दि. 21 जून 2026) रोजी नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहात बेघर संघर्ष समितीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्षस्थान बेघर संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलावर शाह कादर शाह यांनी भूषविले.

बैठकीत गोरगरिबांच्या घरकुलासह विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक वर्षांपासून बेघर व गरजू नागरिकांच्या मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने व उपोषणे करून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अनेकवेळा संबंधित विभागाकडून जागा वर्गीकरण तसेच ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास नकार देण्यात आल्याने घरकुलाचा प्रश्न अद्यापही रखडलेला आहे. यामुळे नाशिक येथील म्हाडा प्रशासनालाही पुढील कार्यवाही करता आलेली नसल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. संबंधित विभागांनी अद्याप सकारात्मक भूमिका न घेतल्याने गरजू नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष दिपक पटेल यांनी बेघर संघर्ष समितीच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. ते म्हणाले, “गोरगरिबांना न्याय मिळेपर्यंत मी बेघर संघर्ष समिती आणि सर्व लाभार्थ्यांसोबत ठामपणे उभा राहीन. बेघर नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण एकत्रितपणे संघर्ष करू.”

पुढे बोलताना दिपक पटेल यांनी सांगितले की, घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. तसेच संबंधित विभागांशी चर्चा करून या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. बेघर व गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

बैठकीस बेघर संघर्ष समितीच्या महिला जिल्हाध्यक्ष रेहाना गणी खाटीक, शहराध्यक्ष रुकय्या पठाण, शहादा शहराध्यक्ष इसराईल पठाण, सुनिता जगताप, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक लाभार्थी उपस्थित होते. घरकुलाच्या मागणीसाठी आगामी काळात अधिक तीव्र पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments