*नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह*
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू होऊनही नंदुरबार जिल्ह्यातील अनेक उर्दू माध्यमाच्या शाळांना आवश्यक पाठ्यपुस्तके अद्याप उपलब्ध झालेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर साजेदा बी मलक अशफाक यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
नगर परिषद नंदुरबारच्या शिक्षण समिती सदस्य तथा AIMIM च्या नगरसेविका साजेदा बी मलक अशफाक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी शाळा सुरू होताच इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच अध्यापन प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.
मात्र, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही जिल्ह्यातील अनेक उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये आवश्यक पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झालेला नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. तसेच शिक्षकांनाही अध्यापन करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध न झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
यासंदर्भात शिक्षण विभागाने वैयक्तिक लक्ष घालून जिल्ह्यातील सर्व उर्दू माध्यमाच्या शाळांना विद्यार्थी संख्येनुसार आवश्यक पाठ्यपुस्तके तात्काळ उपलब्ध करून द्यावीत, तसेच पुरवठा प्रक्रियेसाठी योग्य नियोजन व प्रभावी कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे आणि त्वरित सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षाही साजेदा बी मलक अशफाक यांनी व्यक्त केली आहे.

0 Comments