श्रीक्षेत्र माहूर (अपील बेलखोडे)
किनवट व माहूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या वीज समस्यांमुळे नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्ग त्रस्त झाला असून या गंभीर प्रश्नाची आमदार भीमराव केराम यांनी दखल घेत किनवट येथे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्यापक आढावा बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली तसेच तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
बैठकीत आमदार केराम यांनी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अनियमित लोडशेडिंग, जुनाट व जीर्ण झालेल्या विद्युत खांबांची समस्या, खराब झालेल्या वीजतारा बदलणे, अपुऱ्या क्षमतेच्या डीपीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच ग्रामीण व शेतकरी भागातील वीजपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. नागरिकांना सातत्यपूर्ण व दर्जेदार वीजसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले.
किनवट-माहूर तालुक्यातील शंभरहून अधिक गावांमध्ये अतिरिक्त विद्युत खांबांची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून देत या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आमदार केराम यांनी केली. याशिवाय ग्रामीण भागातील शेतीपंपधारक शेतकऱ्यांना वेळेवर वीजपुरवठा मिळावा, डीपी क्षमतेनुसार सुरळीत वीज उपलब्ध व्हावी आणि तांत्रिक बिघाडांमुळे होणारा व्यत्यय कमी करण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शेतकऱ्यांच्या शेती हंगामावर वीज समस्यांचा प्रतिकूल परिणाम होत असून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे आमदार केराम यांनी यावेळी नमूद केले. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही वीजपुरवठा खंडित होण्याचा परिणाम होत असल्याने महावितरण प्रशासनाने जबाबदारीने काम करून समस्या कायमस्वरूपी मार्गी लावाव्यात, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) नांदेड श्री. गाडेकर, कार्यकारी अभियंता भोकर श्री. बोरगावकर, उपकार्यकारी अभियंता किनवट श्री. केंद्रे, सहाय्यक अभियंता भोकर श्री. बिराजदार, सहाय्यक अभियंता किनवट शहर श्री. मेश्राम, सहाय्यक अभियंता किनवट ग्रामीण-१ श्री. देशमुखे, कनिष्ठ अभियंता किनवट ग्रामीण-२ श्री. चव्हाण तसेच कनिष्ठ अभियंता बोधडी श्री. क्षीरसागर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
जनतेच्या मूलभूत गरजा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी वीजपुरवठ्याच्या समस्या तातडीने सोडविणे आवश्यक असून महावितरणने याबाबत प्रभावी कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी बैठकीच्या शेवटी केले

0 Comments