Ticker

6/recent/ticker-posts

टाळ्यांचा गजर, फुलांचा वर्षाव अन्‌ ज्ञानाची भेट; माहूर तालुक्यात आज पासून शाळांचा जल्लोष



११ हजार पाठ्यपुस्तकांचे वाटप; प्रवेशोत्सवासाठी शाळा सज्ज

 श्रीक्षेत्र माहूर (अपील बेलखोडे) : 

उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळांच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा किलबिलाट घुमणार असून माहूर तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. सोमवार (दि. १५ जून) पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने तालुकाभर प्रवेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे फुले, पुष्पगुच्छ, टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदी वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे. शाळांमध्ये आकर्षक सजावट, स्वागत फलक आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षणाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची शिदोरी पोहोचणार आहे. तालुक्यातील माहूर, लखमापूर, आष्टा, वाई, अंजनखेड, गोंडवडसा, करंजी, सिंदखेड, वानोळा, अनंतवाडी आणि हडसनी या ११ केंद्रांतील शाळांसाठी आवश्यक पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य आधीच पोहोचविण्यात आले आहे.

या केंद्रांतील विद्यार्थ्यांसाठी सुमारे ११ हजार पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असून यामुळे शैक्षणिक कामकाजाला सुरुवातीपासूनच वेग मिळणार आहे. शिक्षण विभाग, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी संयुक्तपणे केलेल्या नियोजनामुळे प्रवेशोत्सव आणि पुस्तक वितरण कार्यक्रम सुरळीत पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आकर्षण निर्माण करण्याबरोबरच शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सोमवारचा दिवस विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा ठरणार आहे.

 माहूर तालुक्यातील ११ केंद्रांतील सर्व शाळांमध्ये पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य पोहोचले असून विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात कोणत्याही अडथळ्याशिवाय होणार आहे.

Post a Comment

0 Comments