Ticker

6/recent/ticker-posts

माझे आणि मुलाचे कॉल डिटेल्स तपासा, दोषी असल्यास कारवाई करा



राजकीय वैमनस्यातून आरोप आमच्या परिवाराला यात ओढण्याचा प्रयत्न करणे चुकीचे – खा. बजरंग सोनवणे


जिल्हा प्रतिनिधी सागर काळे 

केज: बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर विलास घुले यांच्या दुर्दैवी हत्येमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

या हत्येच्या घटनेनंतर आरोपी खासदारांच्या मुलाच्या गाडीतून पळून गेल्याचा आरोप केला जात आहे. यावर बोलताना खासदार सोनवणे यांनी स्पष्ट केले की, जर यात कोणाचाही सहभाग असेल, अगदी माझा मुलगा किंवा मी स्वतः दोषी आढळलो, तर पोलिसांनी आमच्यावरही तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. राजकीय दबावाचा प्रश्नच येत नाही कारण राज्यात ज्यांचे सरकार आहे, पोलीसही त्यांच्याच नियंत्रणात आहेत. पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा यासाठी मी स्वतः माझ्या आणि माझ्या मुलाच्या कॉल डिटेल्स व सीडीआर तपासण्याचे आवाहन पोलिसांना केले आहे. मात्र, जर कोणी केवळ राजकीय वैमनस्यातून किंवा जाणीवपूर्वक आमच्या परिवाराला यात ओढण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे.

गेल्या चार दिवसांपासून विलास घुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार प्रलंबित असून, पीडित कुटुंबाला अद्याप न्याय मिळालेला नाही. या संवेदनशील मुद्द्यावर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सोनवणे यांनी नमूद केले. बीडमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तातडीने निकाल लागण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करावी, जेणेकरून एका वर्षाच्या आत पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, अशी आग्रही मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.


 


Post a Comment

0 Comments