वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे
वैजापूर तालुक्यात अवघ्या एका तासाच्या कालावधीत तीन वेगवेगळे भीषण अपघात घडल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोल्ही घाटात रिक्षा पलटी
छत्रपती संभाजीनगर–नाशिक महामार्गावरील कोल्ही घाटात रिक्षा पलटी होऊन अश्विनी सिद्धार्थ अभंग (वय १८) हिचा मृत्यू झाला. या अपघातात दीक्षा रेवत शिरसाट, पूनम राजू जाधव, शिल्पा संकेत साळवे आणि ऋषिकेश सिद्धार्थ अभंग हे जखमी झाले.
शिवराई शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक
या भीषण अपघातात प्रवीण सुरेश चव्हाण (वय ३२, वैजापूर) आणि विलास भिकाजी खावले (वय ३२, नारेगाव) यांचा मृत्यू झाला. तर राम अर्जुन भुमरे (वय २५, पैठण) हे जखमी झाले आहेत.
महालगावजवळ कुत्रा आडवा आल्याने अपघात
महालगाव परिसरात अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात नेहा श्रीधर अहिरे, शोभा श्रीधर अहिरे आणि देवयानी श्रीधर अहिरे (वय ११, सिन्नर) या तिघी जखमी झाल्या असून देवयानी हिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
उपजिल्हा रुग्णालयात एकच धावपळ
तिन्ही अपघातांतील जखमींना एकाचवेळी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची मोठी धावपळ उडाली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करीत धीर दिला.

0 Comments