Ticker

6/recent/ticker-posts

वऱ्हाडाच्या टेम्पोला कंटेनरची जोरदार धडक; दोन ठार, १९ जखमी...



वैजापूर, प्रतिनिधी अर्जुन शिंदे 

वैजापूर-गंगापूर मार्गावरील घायगाव शिवारात गुरुवारी (४ जून) दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोला समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

मृतांमध्ये ज्ञानेश्वर रुपचंद वाघ (वय २०) आणि अनिता वामन वाघ (वय ३५, दोघेही रा. पाटेगाव, ता. पैठण) यांचा समावेश आहे. ज्ञानेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिता वाघ यांचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटेगाव येथील काशिनाथ ठाकरे यांच्या मुलाचा विवाह येवला तालुक्यातील गोपाळवाडी येथे शुक्रवारी होणार होता. त्यासाठी वऱ्हाडी दोन टेम्पोमधून निघाले होते. त्यापैकी एमएच-२० ईजी-०१५८ क्रमांकाच्या टेम्पोची समोरून येणाऱ्या जीजे-२७ टीएफ-५५३५ क्रमांकाच्या कंटेनरशी समोरासमोर धडक झाली. अपघातावेळी टेम्पोमध्ये सुमारे २५ प्रवासी प्रवास करत होते.

अपघाताची माहिती मिळताच घायगाव परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना वाहनातून बाहेर काढून चार रुग्णवाहिकांच्या मदतीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सर्व जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले तसेच सहायक पोलीस निरीक्षक अर्चना अभंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

जखमींची नावे

जयसिंग रतन वाघ (२५), राम कल्याण वाघ (२०), गणेश रामचंद्र जाधव (३०), अजय बाजीराव जाधव (१८), विशाल जाधव (१८), किसन वामन वाघ (२०), रंजित गुलाब वाघ (२५), जितेंद्र वाघ (२५), शालिनी सोनवणे (३५), सिद्धू वाघ (१९), श्रीनाथ वाघ (२०), कैलास वाघ (२६), चेतन वाघ (२०), सुनील वाघ (३०), सोन्या वाघ (२०), संतोष वाघ (२०), अजय सोनवणे (२०) तसेच अन्य दोन अनोळखी व्यक्ती जखमी झाल्या आहेत.

तासभर वाहतूक ठप्प

या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या मध्यभागी असल्याने वैजापूर-गंगापूर मार्गावरील वाहतूक जवळपास तासभर ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

यात्रेत फुगे विकणाऱ्या ज्ञानेश्वरचा दुर्दैवी अंत

मृत्यू झालेला ज्ञानेश्वर वाघ हा विविध यात्रांमध्ये रंगीबेरंगी फुगे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होता. त्याच्या अपघाती निधनाची वार्ता कळताच वडील रुपचंद वाघ, बहीण व इतर नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. दोन-तीन वर्षांत ज्ञानेश्वरचा विवाह होईल, अशी स्वप्ने कुटुंबीयांनी पाहिली होती; मात्र नियतीने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला

Post a Comment

0 Comments