शाहदुल्ला नगरात मुख्य पाईपलाईन फुटल्याने जनता पाण्यासाठी व्याकुळ; नागरिकांचा तीव्र संताप.
नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह
शहरातील नवनाथ नगर येथील पाण्याच्या टाकीतून शाहदुल्ला नगर टेकडीवरून थेट बागवान गल्लीपर्यंत जाणारी मुख्य पिण्याची पाईपलाईन गेल्या ३ ते ४ वर्षांपासून पूर्णपणे खराब होऊन खचली आहे. मात्र, नंदुरबार नगर पालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाईपलाईन फुटल्याने परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून पालिकेच्या या निष्काळजीपणामुळे नागरिक पाण्यासाठी व्याकुळ झाले आहेत.
परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी केली. परंतु, पालिका प्रशासनाकडून दरवेळी केवळ आश्वासनांची बोळवण केली जात असून, प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र आहे.
२५ वर्षांपासून शाहदुल्ला नगर वाऱ्यावर; पालिका प्रशासनाचा काणाडोळा!
"निवडून आल्यावर विकास करू" असे सांगणारे सत्ताधारी आणि एसी केबिनमध्ये बसणारे पालिकेचे अधिकारी गेल्या २५ वर्षांत शाहदुल्ला नगरच्या मूलभूत समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. सध्या या भागात परिस्थिती इतकी भीषण आहे की, नागरिक नरकयातना भोगत आहेत:
*प्रशासकीय उदासीनता:-* मुख्य पाईपलाईन ३-४ वर्षे तुटलेली असतानाही पालिकेने नवीन पाईपलाईन टाकण्याचे साधे कष्ट घेतलेले नाहीत.
*ड्रेनेज यंत्रणा शून्य:-* शौचालयाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही ड्रेनेज लाईन (वाहिनी) प्रशासनाने तयार केलेली नाही.
*आरोग्याचा प्रश्न गंभीर:-* गटारींची पूर्णपणे दुरावस्था झाली असून, सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.तर नगरपालिकेवर धडक मोर्चा; नागरिकांचा थेट इशारा!
"फक्त कागदी घोडे नाचवणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी प्रत्यक्ष शाहदुल्ला नगरात येऊन इथली नरकसदृश परिस्थिती पाहावी. जर नगर पालिकेने पिण्याच्या पाण्याची नवी पाईपलाईन आणि ड्रेनेजची व्यवस्था तातडीने केली नाही, तर पालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा संतप्त इशारा शाहदुल्ला नगरमधील त्रस्त नागरिकांनी दिला आहे.

0 Comments