खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांनी पश्चिम रेल्वेकडे मांडल्या प्रमुख मागण्या
पालघर, मुंबई: पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांची भेट घेऊन, पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या ठळकपणे मांडल्या. या बैठकीला कैलाश वर्मा आणि संकेत ठाकूर हे देखील उपस्थित होते. या बैठकीदरम्यान, पालघर स्थानकावर अनेक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देणे, विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पाच्या कामाला गती देणे, डहाणू ते चर्चगेट दरम्यान पहाटे ४:०० वाजता सुटणारी लोकल रेल्वे सेवा सुरू करणे आणि बोईसर व डहाणू रोड स्थानकांवर गाड्यांना अतिरिक्त थांबे देणे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. प्रवाशांच्या आणि कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, कोलगाव येथील रेल्वे गेट क्रमांक ४८ जवळ पादचारी पुलाचे (FOB) तातडीने बांधकाम करण्याची मागणीही खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी यावेळी मांडली. पश्चिम रेल्वेने यापैकी अनेक मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असून, यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

0 Comments