अवैध जळाऊ लाकूड वाहतूक करणारे वाहन जप्त; ३.८२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नवापूर (प्रतिनिधी) पंकज आहिरे
नवापूर वनपरिक्षेत्रातील भवरे नियतक्षेत्रात वनविभागाने अवैध जळाऊ लाकूड वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ३ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
दिनांक २७ मे २०२६ रोजी रात्री वन कर्मचारी गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भवरे परिसरातील रस्त्यावर तपासणी करण्यात आली. त्यावेळी वाहन क्रमांक GJ.15 YY.5336 मध्ये अवैधरित्या आडजात प्रजातीचे जळाऊ लाकूड भरलेले आढळून आले. वन कर्मचारी दिसताच वाहन चालकाने वाहन रस्त्यातच सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
वनविभागाने तत्काळ वाहन ताब्यात घेत शासकीय विक्री आगार, नवापूर येथे जमा केले. जप्त करण्यात आलेल्या वाहनाची अंदाजे किंमत २ लाख ८५ हजार रुपये असून जळाऊ लाकडाची किंमत सुमारे ९७ हजार रुपये आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३ लाख ८२ हजार रुपये असल्याची माहिती वनविभागाने दिली.
या प्रकरणी वनरक्षक फिलिप गावित यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असून पुढील तपास वनपाल खेकडा हे म. वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
सदर कारवाई मा. वनसंरक्षक श्रीमती नीनू सोमराज (धुळे), उपवनसंरक्षक श्री संतोष सस्ते (नंदुरबार), विभागीय अधिकारी दक्षता पथक श्री सदगीर (धुळे), सहाय्यक वनसंरक्षक श्री रोशन बुवा (नंदुरबार) तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी श्री अमोल काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत वनरक्षक फिलिप गावित, उदेसिंग पाडवी, आतिश वळवी, नरेश कोकणी, अजय भोये, गोपाल गावित तसेच वाहन चालक निलेश गावित यांनी सहभाग घेतला.

0 Comments