वैजापूर येथील लॉजवरील घटना; प्रेमसंबंधातून वाढवली जवळीक...
वैजापूर प्रतिनिधी : अर्जुन शिंदे
वैजापूर येथे एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक येथील २३ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून गोकुळ शिवाजी बावचे (रा. पानवी खंडाळा, ता. वैजापूर) याच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी गेल्या दोन वर्षांपासून वैजापूर येथील एका फार्मसी महाविद्यालयात डी-फार्मसीचे शिक्षण घेत होती. शिक्षणासोबतच ती शहरातील एका खासगी रुग्णालयात पार्टटाईम नर्स म्हणूनही कार्यरत होती. याच दरम्यान उपचारासाठी आलेल्या गोकुळ बावचे याच्याशी तिची ओळख झाली. पुढे दोघांमध्ये संवाद वाढत गेला आणि त्याचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले.
तक्रारीनुसार, आरोपी गोकुळ बावचे हा तरुणीला वैजापूर शहरातील गंगापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये वारंवार भेटण्यासाठी बोलवत होता. दोघांमधील जवळीक वाढल्यानंतर १० जुलै २०२५ रोजी आरोपीने तिला लाडगाव रोडवरून रोटेगाव येथील एका लॉजमध्ये नेले. तेथे लग्नाचे आश्वासन देत तिच्या इच्छेविरुद्ध प्रथमच शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर जुलै २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपीने वेगवेगळ्या वेळी विविध लॉजमध्ये नेऊन लग्नाचे आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केल्यावर तो वेळ मारून नेत लवकरच लग्न करू असे सांगत होता. एप्रिल आणि मे २०२६ मध्येही आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अखेर स्वतःची फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर पीडित तरुणीने वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार वैजापूर पोलिसांनी गोकुळ शिवाजी बावचे याच्याविरुद्ध बलात्कार तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे करीत आहेत.

0 Comments